औरंगाबाद – चक्री ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात वाळूज औद्योगिक परिसरातील कामगार अडकले आहेत. सरकार मान्य लॉटरीच्या नावाखाली सिकंदरच्या टोळीकडून खुलेआम वीस पेक्षा जास्त चक्री ऑनलाईन जुगार अड्डे सुरु असल्याचे ‘सांजवार्ता’च्या स्टिंगमध्ये समोर आले आहे. येथे कोट्यवधींची उलाढाल होत असून पोलिसांना चकवा देऊन राजरोसपणे हा धंदा सुरु आहे.
हजारो कामगार अडकले चक्रीच्या चक्रात
चक्री जुगार हा सरकारमान्य असल्याचे भासवून हजारो
कामगार
या जुगाराच्या चक्रात अडकले असून ते आपली सर्व कमाई येथे
लावत आहेत. हा जुगार तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सांजवार्ताने
या जुगारे स्टिंग ऑपरेशन केले. यात स्पष्ट दिसत आहे की, गुंडाच्या टोळीचे सदस्य
ऑनलाईन चक्री जुगार चालवत आहेत. वाळूजमधील गर्दीच्या परिसरात खुलेआम हे जुगार
अड्डे सुरु आहेत. या अड्ड्यांवर पोलिस कारवाई करणार आहेत की नाही, असा सवाल जागरुक
नागरिकांनी उपस्थित केला आहे. यामुळे हजारो कामगार आपला संसार उद्ध्वस्त करत
असल्याचे नागरिकांनी सांगितले.
वाळूज महानगर बनले अवैध धंद्यांचे माहेरघर
वाळूज परिसरात मराठवाड्यासह बाहेर राज्यातून
आलेले कामगार मोठ्या प्रमाणात राहातात. दिवसेंदिवस या परिसरात लोकसंख्या वाढत आहे.
याचाच फायदा घेत येथे छुप्या पद्धतीने पोलिसांच्या नजरेआड अनेक अवैध धंदे फोफावत
आहेत.
सरकारमान्य लॉटरी बहुतेक बंद
भारत सरकारमान्य ऑनलाईन लॉटरी मागील अनेक
वर्षांपासून राज्यात सुरू होत्या. मात्र जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर
बक्षिसामध्ये तफावत आणि त्याचे स्वरूप बदलल्याने सरकारमान्य ऑनलाईन लॉटरी मोठ्या
प्रमाणात बंद झाली आहे. मात्र वाळूजमधील गुंडांची टोळी चक्री जुगार ही सरकार मान्य
लॉटरी असल्याचे भासवत आपले अवैध धंदे चालवत आहे.
कोण चालवतो चक्री
वाळूज औद्योगिक परिसरातील कुख्यात गुंड सिकंदर अली
आणि त्याचा साथीदार डी.जे. हे दोघेही अवैध चक्री जुगार चालवत आहे. मागील सहा महिन्यांपासून
हा अवैध जुगार राजरोसपणे सुरू आहे. परिसरात उघडपणे सुमारे २० पेक्षा अधिक
ठिकाणी गाळे घेऊन कॉम्प्यूटरवर हा जुगार सुरू आहे.
दिवसभर कंपनीत राबणारा कामगार आपली दिवसभराची
कमाई या जुगार अड्ड्यावर हारत आहे. यामुळे त्यांचे कुटुंब
उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. जुगाराचे हे अड्डे बंद करावे अशी मागणी
जागरुक नागरिकांकडून होत आहे.
सिकंदर टोळीची दहशत
रांजणगाव, सजापुर, जोगेश्वरी, बजाजनगरसह वाळूज
परिसरात सिकंदरच्या टोळीची कामगार वर्गात दहशत आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात
उघडपणे बोलण्याची हिम्मत कोणीही दाखवत नाही. याचाच फायदा घेत तो परिसरात अवैध धंदे
चालवत आहे. कोणीही माझे काही करू शकत नाही
अशा तोऱ्यात तो वावरत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
या ठिकाणी सुरू आहेत जुगार अड्डे
क्लिपटन वाइन शॉप जवळ,रांजणगाव
एकतानगर नाल्याच्या बाजूला
कामळापूर फाट्यावर,
रांजणगाव
दत्त नगर रोड, रांजणगाव
पावननगर, रांजणगाव
देवगिरी कॉलोनी मेनरोड
महाराणा प्रतापचौक,
बजाज नगर
रांजणगाव कमानी जवळ
आयुक्तालयातील एका कर्मचाऱ्याची मदत
पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेला हवालदार दर्जाचा एक पोलिस कर्मचारी सिकंदर टोळीच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हा पोलिस हवालदार मी अधिकाऱ्यांना सांभाळून घेतो असे सांगत सिकंदरच्या अवैध धंद्यांना बळ देत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच एवढ्या खुलेआम २० -२५ ठिकाणी जुगार अड्डे सुरू असल्याची चर्चा आहे.












